भारतातील जंगले आणि वृक्ष यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. विविध कारणांमुळे गेल्या १००-१५० वर्षात प्रचंड प्रमाणात वृक्ष-तोड केली गेली. पावसाचे पाणी जमिनीत जीरण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्ष अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात. पण आज आपण कुठल्याही गावात गेलो तर तिथले जंगल किंवा वृक्ष हे कमी झाल्याचे निदर्शनास येते. याचा परिणाम असा झाला आहे कि जमिनीची प्रचंड धूप होते, पडणारा बराचसा पाऊस वाहून जातो आणि यामुळे शेती, पाणी आणि पर्यावरण यांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. चांगली जंगले ही फक्त पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाची नाहीत तर उन्हाळ्यात स्थानिक लोकांचा रोजगार सुद्धा जंगलातून मिळणाऱ्या वनोपज (फळे, फुले, मध, डिंक, लाख, चारोळी, मोहा, बांबू इ.) वर अवलंबून असतो. त्यामूळे त्यांचे संरक्षण आणि संवर्धन उपजीविकेच्या दृष्टीकोनातून सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे.