आपल्या परिसरातील सर्व सजीव म्हणजे प्राणी, पक्षी, कीटक, औषधी वनस्पती, वृक्ष, जमिनीतील जीवाणू, समुद्र आणि नद्यातील जलचर यांचा यात समावेश होतो. या सर्व सजीव सृष्टीला जैवविविधता असे म्हटले जाते. या सृष्टीच्या निर्मात्याने निर्माण केलेला प्रत्येक सजीव हा या निसर्ग-साखळीचा एक भाग आहे. वनस्पती हवेतून आणि जमिनीतून अन्न-द्रव्ये घेतात आणि वाढतात; त्यांना खाऊन मधमाशा, तृणभक्षक प्राणी (हरीण, ससा यासारखे शाकाहारी प्राणी) वाढतात आणि या प्राण्यांना खाऊन सृष्टीतील मांसाहारी प्राणी जसे कि वाघ, कोल्हा, सिंह इ. वाढतात. या प्रक्रियेत अन्नाच्या माध्यमातून उर्जा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे संक्रमित होत असते. या साखळीच्या शेवटी वाघ असतो आणि तो मृत पावल्यानंतर ही उर्जा पुन्हा मातीत आणि हवेत विलीन होते. जेंव्हा या अन्न साखळीतील कोणताही प्राणी नष्ट होतो, तेंव्हा या संपूर्ण साखळीला आणि पर्यावरणाला धोका उत्पन्न होतो कारण पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवाचे अस्तित्व पृथ्वीसाठी आवश्यक असते. म्हणून आपल्या परिसरातील जैव-विविधता टिकून राहण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.