मनुष्य हा देखील या सृष्टीचाच एक भाग आहे. आणि म्हणूनच त्याचा विकास करताना वर दिलेल्या सर्व संसाधनांचा विकास आवश्यक आहे. मानवाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षण, आरोग्य, संस्कार आणि स्वावलंबन अशा किमान ४ बिंदूंचा विचार करावा लागेल. शिक्षणामध्ये गावातील शाळेत मिळणारे शिक्षण एवढाच अर्थ अपेक्षित नसून त्याला जीवनमुल्ये-आधारित-शिक्षण आणि ती व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल असे कौशल्य-प्रशिक्षण मिळाले पाहिजे. संस्कार हे २ प्रकारचे असतात – वैयक्तिक (घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करणे, संपूर्ण गाव एक परिवार असा विचार करणे) आणि सामाजिक (व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, जातीभेद न पाळणे). आपले सणवार, कालसुसंगत चालीरीती आणि संस्कृती जपणे ही आपलीच जबाबदारी आहे. आरोग्यामध्ये मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे निरोगी राहणे आवश्यक आहे. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी ताण-तणाव विरहीत जीवन आणि शारीरिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम, ऋतूप्रमाणे योग्य आहार आवश्यक आहे. गावातील सर्वजण आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असणे महत्वाचे आहे, त्यासाठी कृषी आणि लघु-उद्योग यांना समान महत्व दिले गेले पाहिजे. गावाच्या बहुतांशी गरजा गावात आणि बाकीच्या आजूबाजूच्या परिसरातून पूर्ण होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.