ग्रामविकास ला योगदान म्हणजे देशाच्या ग्रामीण विकासाला योगदान.

आमच्या विषयी



पाऊले प्रगतीची...



आपल्या कृषिप्रधान देशात लाखो खेडयांच्या विकासातच देशाचा विकास सामावलेला आहे. हे शाश्वत सत्य ध्यानात घेऊन देशभरात ग्रामविकासाचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यातील १०१ गावांमध्ये समग्र ग्रामविकासाची योजनाबध्द आखणी आणि सुत्रबध्द अंमलबजावणी सुरु आहे. या सर्व गावांतील पंचशक्तींच्या (धार्मिक, युवा, मातृ, सज्जन व संघशक्ती) आधारावर गावातील सप्त संपदांचा (भू, जल, वन, गो, जीव, उर्जा व जन) विकास करुन गावाला विकास पथावर नेण्याचे प्रयत्न चालू आहेत. याच कार्याचा हा थोडक्यात आढावा...



ग्रामविकास - पार्श्वभूमी



सुमारे १००० वर्षापूर्वीपर्यंत आपला भारत देश जगातील समृद्ध, सुखी आणि समाधानी देश म्हणून ओळखला जात असे, भारताचे चिरंतन सुखाचा धागा असलेले तत्वज्ञान, अध्यात्मज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी जगातील लक्षावधी लोक भारतात येत असत व 'सोन्याचा धूर निघणाऱ्या या देशातून तृप्त होऊन जात असत. त्याकाळी जगातील एकूण व्यापाराच्या किमान ३०% वाटा हा भारताचा होता आणि भारत ही जगातील आदर्श महासत्ता होती. इतर देशांशी व्यापार करताना मोबदला म्हणून आपल्याला आणण्यासारखे मुख्यतः फक्त सोने असे, म्हणूनच बाहेरच्या देशात भारतीय मालाची विक्री करून व्यापारी सोने घेवून येत. अशा रीतीने देशात सोन्याचे प्रमाण प्रचंड वाढले, त्यातून 'सोन्याचा धूर' हा वाक्प्रयोग प्रचलित झाला होता. त्या काळा पर्यंत भारताची संपूर्ण सामाजिक व आर्थिक व्यवस्था ही ग्राम केंद्रित होती. सर्वच दृष्टीने संपन्न अशी छोटी छोटी लाखो स्वावलंबी गावे हा भारताचा आत्मा होता.
आजही देशातील ६५-७०% लोक ग्रामीण भागात राहतात. पण आज शहरी आणि ग्रामीण भागात विकासाचा जो असमतोल दिसत आहे त्याची कारणे समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या १५०-२०० वर्षांचा इतिहास नीट समजून घेतला पाहिजे. इंग्रजांनी जेंव्हा भारतावर राज्य करायला सुरुवात केली तेंव्हा काय स्थिती होती, नंतर १५० वर्षे त्यांनी आपल्या देशावर राज्य केले त्या काळात काय बदल झाले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय विकास झाला, याचा सविस्तर आढावा आपल्याला घ्यावा लागेल. हा सर्व इतिहास अत्यंत संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा खाली प्रयत्न केला आहे.